हवाई दलातील निवृत्त विंग कमांडर यांच्या घरात केली होती चोरी : वानवडी पोलिसांची कामगिरी
पुणे : हवाई दलातून निवृत्त झालेल्या विंग कमांडर यांच्या घरात चोरी करणाऱ्या महिलेला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, तिच्याकडून चोरलेले ५ लाख ८७ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सुधा राजेश चौगुले (वय ३५, रा. बोराटे वस्ती, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत हवाई दलातील निवृत्त विंग कमांडर (वय ७८, रा. सोपानबाग, घोरपडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घरी सुधा चौगुले ही घरकाम करीत होती. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून तिने कपाटातील ५ लाख ८७ हजारांचे सोन्याचे हिरेजडीत दागिने चोरून नेले होते.
२७ ऑगस्ट रोजी कपाटातून दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांच्या घरी दोन महिला घरकाम करीत असल्याने पोलिसांनी दोघींवर तपास केला. त्यावेळी एका मोलकरणीवर संशय आला.
त्याच वेळी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की बी. टी. कवडे रोड येथे राहणारी सुधा चौगुले ही अचानकपणे सोनाराकडे दागिने गहाण ठेवण्याकरिता आली आहे. पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन या महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्हा केल्याची कबुली दिली व लपवून ठेवलेल्या ठिकाणावरून हे दागिने काढून दिले. त्यानंतर पोलिसांनी सुधा चौगुले हिला अटक केली आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अतुल गायकवाड, विष्णु सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल पिलाणे, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, यतीन भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, शैला ठेंगल, पुष्पा बोरकर यांनी केली.
